नुकसानीबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय:; हिमांशू जोशी यांची माहिती
गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथील पोस्टात आलेली टपाल गेली दीड वर्षे वितरीतच केली गेली नव्हती. याप्रकरणी करन थोरात (बीड) नामक पोस्टमनला निलंबित करण्यात आल्याची माहिती पोस्ट इन्स्पेक्टर हिंमांशू जोशी यांनी दिली. त्याचबरोबर पोस्टमनची खातेनिहाय चौकशी सुरू करणार असून ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन सदर टपाले वितरीत करण्यात येणार आहेत. सोमवारपर्यंत वेळणेश्वर पोस्टामध्ये नवीन पोस्टमन नियुक्त केला जाईल असेही जोशी यांनी स्पष्ट केले.
वेळणेश्वर पोस्ट कार्यालयातून गेली दीड वर्षे आलेली टपाल वितरीतच केली नसल्याची बाब समोर आल्याने ग्रामस्थांनी अधिक चौकशीसाठी पोस्टामध्ये चौकशी सुरू केली होती. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारींमुळे शनिवारी पोस्ट इन्स्पेक्टर हिमांशू जोशी यांनी वेळणेश्वर पोस्ट कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर संबंधित पोस्टमन करन थोरात याला निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. या प्रकाराची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
नुकसानप्रकरणी लेखी म्हणणे
दरम्यान, ज्यांचे टपाल वितरण झालेले नाही, अशी टपाल बाजूला काढून संबधितांजवळ संपर्क साधला जात आहे. आधारकार्ड, एटीएम कार्ड, बैंक पासबुक, चेकबुक, महत्वाच्या नोटिसा यांचे वितरण सुरू आहे. ग्रामस्थांनी आपली टपाल वेळेत पोहोचली नसल्याने आपले नुकसान झाले असल्याचा दावा केला आहे. त्यांचे लेखी स्वरुपात म्हणणे घेतले जात आहे. त्यांच्या नुकसानीबाबत वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असेही जोशी यांनी सांगितले.









