Thursday, June 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा ‘डिजिटल जनगणने’साठी सज्ज

रत्नागिरी जिल्हा ‘डिजिटल जनगणने’साठी सज्ज

१ मे पासून नागरिकांना ऑनलाईन माहिती भरता येणार

रत्नागिरी:- भारताच्या आगामी ‘डिजिटल जनगणना २०२७’ साठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून प्रत्यक्ष कामकाजाला वेग आला आहे. या ऐतिहासिक जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिक आता स्वतःहून आपली माहिती ऑनलाईन नोंदवू शकणार आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

डिजिटल जनगणनेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार १२३ कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्याची भौगोलिक व्याप्ती लक्षात घेऊन प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ७३१ घर यादी गट निश्चित करण्यात आले आहेत.

मोहिमेसाठी २ हजार ६२१ प्रगणक आणि ४६० पर्यवेक्षक असे एकूण ३ हजार १२३ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना तांत्रिक मदतीसाठी ४२ क्षेत्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. ग्रामीण भागासाठी तहसीलदार तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी हे ‘चार्ज ऑफिसर’ म्हणून काम पाहणार आहेत. नागरिकांना जनगणनेत सहभागी करून घेण्यासाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ‘सेल्फ इन्युमरेशन’ प्रक्रिया राबवली जाणार आहे. नागरिक secensus.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरू शकतात. पोर्टलवर विचारलेल्या ३४ प्रश्नांची उत्तरे भरल्यानंतर नागरिकांना एक ‘एसई आयडी’ प्राप्त होईल.हा आयडी जपून ठेवावा, कारण जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा आयडी दाखवणे आवश्यक आहे.

डिजिटल जनगणनेचा पहिला टप्पा १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांसाठी ऑनलाईन माहिती भरण्याची संधी दिली जाणार आहे. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. यामध्ये घर यादी आणि गृहनिर्माण जनगणनेचा पहिला टप्पा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पूर्ण केला जाणार आहे

“जनगणनेचे काम राष्ट्राच्या भविष्यातील नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी अधिकृत पोर्टलचा वापर करावा किंवा घरी येणाऱ्या प्रगणकांना वस्तुनिष्ठ माहिती देऊन सहकार्य करावे.”
मनुज जिंदल, जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी.