रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या रत्नागिरीकरांना निसर्गाच्या बदलत्या रूपाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी पहाटे काही भागात किरकोळ पाऊस पडला तर सकाळपासूनच आकाशात ढगांनी दाटी केली होती. 24 एप्रिल पर्यंत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानामुळे हाताशी आलेला आंबा पीक गमावण्याची भीती निर्माण झाल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे हापूस आंब्याचे उत्पादन आधीच घटले आहे. सध्या बागांमध्ये आंबा तयार होण्याच्या आणि काढणीच्या अंतिम टप्प्यात आहे. अशा स्थितीत जर अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाली, तर तयार आंब्यावर डाग पडण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला आंबा गळून मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्द्रता वाढल्याने किड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात निर्माण झालेली ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. २२ ते २४ एप्रिल दरम्यान हवामान बिघडलेले राहील. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीची दाट शक्यता आहे. प्रचंड उकाडा आणि दमट हवामानामुळे ढग जमा होऊन स्थानिक पातळीवर पावसाचा जोर वाढू शकतो.
पुढील दोन-तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार असल्याने प्रशासनाने शेतकरी आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बागायतदारांनी तयार झालेला आंबा त्वरित काढून सुरक्षित ठिकाणी हलवावा. विजा चमकत असताना झाडाखाली, इलेक्ट्रिक खांबांजवळ किंवा उघड्यावर आश्रय घेऊ नये.हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे सतत लक्ष ठेवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.









