Thursday, June 4, 2026
spot_img
Home शैक्षणिक जिल्ह्यातील २६३ अतिरिक्त शिक्षकांची आजची समायोजन प्रक्रिया रद्द

जिल्ह्यातील २६३ अतिरिक्त शिक्षकांची आजची समायोजन प्रक्रिया रद्द

ना.उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला निर्णय

रत्नागिरी:- जिल्ह्यातील विविध शाळांमधील २६३ अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन गुरुवार १६ एप्रिल रोजी केले जाणार होते. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळाचे लक्ष या निर्णयाकडे लागले होते. अतिरिक्त ठरलेल्या सदर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समायोजनाची प्रक्रिया आज पार पडणार होती. मात्र माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असताना हरकतींवरील सुनावणी देखील पूर्ण झाली आहे. मात्र सदरचा समायोजना कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले.

जिल्ह्यातील पटसंख्ये-अभावी अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यामध्ये अतिरिक्त ठरलेले शिक्षक २६३ असून अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी संख्या १५० इतकी आहे. माध्यमिक खासगी शाळा (रिक्त पदे) ३६९ इतकी आहे. विनाअनुदानित शाळा (रिक्त पदे) २१४ असून एकूण रिक्त पदे ३१५ इतकी आहे.

समायोजन प्रक्रियेचा मोठा फटका जिल्ह्यातील काही शाळांना बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ९९ शाळा शून्य शिक्षकी होणार आहेत. खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा यात समावेश आहे.समायोजन प्रक्रियेपूर्वी जिल्हाभरातून एकूण २९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी काही हरकतींचे जागेवरच निराकरण करण्यात आले, तर उर्वरित १३ हरकतींवर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सुनावणी घेण्यात आली असल्याचे समजते.