संगमेश्वर:- देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावरील लोवले येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. वळणावर निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचे एलपी वाहन देवरुखहून संगमेश्वरकडे येत होते. त्याचवेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा एमएच १० सीआर ३४५६ क्रमांकाचा ट्रक समोरून येत होता. लोवले येथील वळणावर एलपी चालकाने वाहन रस्त्याच्या मधोमध आणल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडकेनंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बॉक्साईटने भरलेला ट्रक सुमारे पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की एलपी वाहनाच्या केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला.
या अपघातात एलपी चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) हा केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. या धाडसी बचावकार्यामुळे त्याचे प्राण वाचले.
या अपघातात बालाजी कोंडेवार आणि ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, एलपी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.









