रत्नागिरी:- जिल्हा परिषद विषय समित्या सदस्य निवड निवडणुकीत विरोधी सदस्यांनी काही समित्यांमध्ये अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक रंगणार अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विनंती वरुन विरोधी सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने या समित्यांची निवड बिनविरोध झाली. यामध्ये विरोध पक्षांच्या पदरात बांधकाम समिती सदस्यपद मिळाले तर राष्ट्रवादीच्या सदस्यांना एक समिती बदलून देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यानंतर मंगळवारी समितींच्या सदस्यपदांची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपाध्यक्ष विलास चाळके व सर्व सभापती उपस्थित होते. स्थायी समिती, जलव्यवस्थापन समिती, वित्त समिती, शिक्षण समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती, कृषी समिती, पशुसंवर्धन समिती, समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती सदस्यपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. दुपारी 1 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी स्थायी, जलव्यवस्थापन, बांधकाम, समाजकल्याण या समितीच्या सदस्यपदासाठी विरोधकांनी अर्ज दाखल केले होते. विरोधकांच्या अर्जांसह समितीच्या सदस्यपदांसाठी असलेले अन्य अर्जही वैध ठरले होते. त्यामुळे अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
याच कालावधीत शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, शशिकांत चव्हाण, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी विरोधी सदस्य विक्रांत जाधव, संतोष थेराडे, नेहा माने, प्रमोद निवळकर, प्रमोद गांधी यांच्यासह श्रीमती कुवळेकर यांच्याशी चर्चा केली. याचवेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी विक्रांत जाधव यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यामुळे जाधव यांनी ज्येष्ठ नेते सामंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विरोधी पक्षाचे सदस्य स्थायी समितीसाठी हटून बसले होते. मात्र त्यानंतर बांधकाम समिती देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतल्यानंतर समिती सदस्यांचे भरलेले अर्ज मागे घेण्यात आले. ठाकरे गटाच्या प्रमोद निवळकर यांना बांधकाम व कृषी समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय बिरवटकर यांनीही जाहीर झालेल्या सदस्यत्वाबाबत नाराजी व्यक्त करीत ना. उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना मिळालेली आरोग्य समिती बदलून त्यांना बांधकाम व कृषी समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले. त्यानंतर खेळीमेळीच्यावातावरणात समिती सदस्य निवड सभा पार पडली व अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सर्व समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर केली.









