प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हापूस थेट ‘युके’त

डझनला २६०० रुपयांचा दर; हवाई खर्चात मात्र दुप्पट वाढ

रत्नागिरी:- नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे सावट असतानाही कोकण हापूस सातासमुद्रापार पोचला आहे. यंदाच्या हंगामातील १ हजार डझन हापूस युनायटेड किंगडम (युके) मधील बाजारपेठेत दाखल झाला असून, तिथे भारतीय चलनानुसार प्रति डझन २६०० रुपये (२६ पाउंड) इतका विक्रमी दर मिळत आहे.

आखाती देशांमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठी बंधने आली आहेत. याचा थेट परिणाम निर्यातीवर झाला असून, एरवी १५० ते २०० रुपये प्रति किलो असणारे विमान भाडे आता ३५० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. भाड्यात दुप्पट वाढ होऊनही, हापूसची जागतिक मागणी लक्षात घेता ‘ग्लोबल कोकण’च्या माध्यमातून ही निर्यात यशस्वी करण्यात आली आहे.

युकेमधील विक्रेते तेजस भोसले यांनी ‘ग्लोबल कोकण’चे संजय यादवराव यांच्याशी संपर्क साधून ही मोहीम आखली. राजापूर, लांजा आणि सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले येथील बागायतदारांकडून निवडक १ हजार डझन आंबा संकलित करण्यात आला. वाशी बाजार समितीमध्ये आवश्यक प्रक्रिया आणि ‘फायटो सर्टिफिकेट’ प्राप्त केल्यानंतर, हा माल विमानाने युकेला रवाना झाला. यंदा हवामान बदलामुळे हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. स्थानिक बाजारपेठेतही आंब्याला चांगला दर मिळत असल्याने निर्यातीसाठी माल उपलब्ध होईल की नाही, अशी शंका होती. मात्र, परदेशातील ग्राहकांची प्रतीक्षा संपवण्यासाठी बागायतदारांनी निर्यातीला प्राधान्य दिले आहे. खर्च कमी झाल्यास आगामी काळात इंग्लंडसह आसपासच्या देशांत अधिक प्रमाणात हापूस विक्री करणे शक्य होईल, असा विश्वास तेजस भोसले यांनी व्यक्त केला.


यंदा हंगामाच्या शेवटपर्यंत हापूस उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे. मात्र, परदेशातील ग्राहकांची मागणी आणि हापूसची प्रतिष्ठा जपण्यासाठी आम्ही निर्यातीचा प्रयत्न केला आहे. वाशीहून युकेला गेलेल्या या आंब्यामुळे बागायतदारांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्याचा आमचा मानस आहे असे मत ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी व्यक्त केले.