रत्नागिरीत प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता
रत्नागिरी:- मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता घाम काढणार आहे. मागच्या २४ तासांत हवामानात मोठे बदल झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तुफान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेळ हा ताशी ५० किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईसह कोकणात मात्र सर्वाधिक उष्णता वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरीसह ५ जिल्हे सर्वात हॉट असतील असा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या मते, सध्या देशात एक मजबूत वेस्टर्न डिस्टरबन्स आणि सायक्लोनिक सर्क्युलेशन यांचा एकत्रित परिणाम म्हणून अशी विचित्र स्थिती तयार झाली आहे. भूमध्य समुद्राकडून येणारे ओले वारे जेव्हा हिमालयाच्या भागात धडकतात, तेव्हा उत्तर भारतात पाऊस आणि बर्फवृष्टी होते.
यावेळचा हा डिस्टरबन्स खूप जास्त ताकदवान आहे. हवेच्या कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे ढगांची चक्राकार हालचाल सुरू झाली आहे. हे चक्र सध्या उत्तर आणि पूर्व भारतावर सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेत ओलावा वाढला आहे. जेव्हा हा ओलावा गरम हवेच्या संपर्कात येतो, तेव्हा वेगाने ढग तयार होतात आणि अचानक गडगडाटासह पाऊस पडतो.
पाऊस थांबला असला तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ शकते. म्हणजेच, पहाटे आणि रात्री हलका गारवा जाणवेल, तर दिवसा उन्हाचा चटका वाढायला सुरुवात होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही आता आकाश स्वच्छ राहील, ज्यामुळे आर्द्रता कमी होऊन थोडा दिलासा मिळेल.
कोकण आणि गोव्याचा विचार केला तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग पट्ट्यात पाऊस होणार नाही. इथे प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता आहे. ५ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने खास हिटवेवचा अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवला आहे.









