राजापूर:- सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरड व धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणावर राजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना शुक्रवार, दिनांक १३ मार्च रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास हातिवले बस स्टॉप येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंत संतोष अवसरे (वय ३० वर्षे, रा. पडवे अवसरेवाडी, ता. राजापूर) हा तरुण हातिवले बस स्टॉपसमोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूच्या नशेत होता. नशेत असताना त्याने मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली आणि परिसरात धिंगाणा घातला. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
राजापूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा लक्ष्मण कोंडवळ (वय ३०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्राद्वारे स्पष्ट केले.









