Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई; फेब्रुवारीत २ कोटींहून अधिक दंड वसूल

कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई; फेब्रुवारीत २ कोटींहून अधिक दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वेने आपल्या मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली असून फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात एकूण ८७३ विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. यादरम्यान ४१,५२२ प्रवासी विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटासह प्रवास करताना आढळले. या प्रवाशांकडून रेल्वेचे भाडे आणि दंड स्वरूपात २ कोटी ४१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

चालू आर्थिक वर्षाचा (२०२५-२६) विचार केला असता, फेब्रुवारी अखेरपर्यंत कोकण रेल्वेने एकूण १०,३६८ विशेष मोहिमा राबवल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ४,५४,८४९ केसेस पकडण्यात आल्या असून, एकूण २५ कोटी २१ लाख रुपयांचा महसूल दंड म्हणून जमा झाला आहे.

येणाऱ्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, कोकण रेल्वेने ही मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा बल आणि इतर रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण मार्गावर कडक तपासणी केली जाणार आहे. प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी विनातिकीट प्रवास टाळण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘केआर मिरर’ अ‍ॅप डाऊनलोड करावे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.