रत्नागिरी:- रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. आरटीओच्या ताफ्यात आता अत्याधुनिक ‘मोबाईल ट्रॅफिक एन्फोर्समेंट सिस्टम’ नावाचे हायटेक वाहन दाखल झाले आहे. या वाहनामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर आता थेट वचक बसणार आहे.
हे नवीन वाहन पूर्णपणे रडार आणि वाय-फाय तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामध्ये बसवण्यात आलेले सेन्सर्स आणि कॅमेरे रस्त्यावरील वाहनांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवतील. विशेष म्हणजे, नियम मोडणाऱ्या वाहनांना रस्त्यात न थांबवता ही यंत्रणा स्वयंचलितपणे कारवाई करेल.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अवधूत विश्वनाथ कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनाद्वारे प्रामुख्याने खालील नियमांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवले जाईल.
या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे वाहन थांबवण्याची आता गरज पडणार नाही. ही यंत्रणा चालत्या वाहनाचा फोटो आणि माहिती टिपून घेईल आणि संबंधितांवर थेट ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाईल. यामुळे वाहतुकीत अडथळा न येता पारदर्शक पद्धतीने नियम अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. करपे आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. तामणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आरटीओ प्रशासनाने सर्व नागरिकांना आणि वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले असून, सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.या हायटेक यंत्रणेमुळे आता रत्नागिरीतील रस्त्यांवर शिस्त येईल आणि अपघातांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.









