रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात आता मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ९ मार्च रोजी ९ पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड होणार असून, १६ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.
९ मार्चला पंचायत समिती सदस्यांची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड या ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवड विशेष सभेत केली जाईल.
सभापती, उपसभापती निवडीनंतर सोमवारी १६ मार्च रोजी जि.प. चे नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी १६ मार्चला नुतन जि. प. सदस्यांची सभा बोलावण्यात आली आहे.
७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाले होते. या निकालांमध्ये शिवसेनेने (शिंदे गट) जिल्ह्यात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे:
जिल्हा परिषदेत एकूण ५६ जागांपैकी ४१ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पंचायत समितींमध्ये बहुतांश तालुक्यांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असले तरी चिपळूण पंचायत समितीत पेच निर्माण झाला आहे. येथे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नसून, सत्तेच्या चाव्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठींकडे आपली वर्णी लागावी यासाठी सदस्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
निकालाला महिना उलटून गेल्यानंतर आता निवडीचा मुहूर्त निघाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी कुणाला साथ देणार आणि शिवसेनेतून कोणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









