कोकणकन्या-मांडवी एक्स्प्रेसला जादा डबे

रत्नागिरी:- कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वांत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला जादा डबे कायमस्वरुपी जोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक २०१११ आणि ट्रेन क्रमांक २०११२ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव गोवा कोकणकन्या एक्स्प्रेस ट्रेनला ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेसप्रमाणेच ट्रेन क्रमांक १०१०३ आणि ट्रेन क्रमांक १०१०४ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव गोवा मांडवी एक्स्प्रेस ट्रेनला ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी २०२६ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे सुमारे १६६ अधिक जागा कायमच्या वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, या दोन्ही ट्रेन LHB डब्यांसह चालवल्या जातात. कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला सध्या फर्स्ट एसी+ २ टियर एसीचा १ डबा, २ टियर एसीचा १ डबा, ३ टियर एसीचे ४ डबे, ३ टियर इकॉनॉमीचे २ डबे, स्लीपर ०७ डबे, जनरल ०४ डबे, खानपान सेवेचा १ डबा, जनरेटर कार १ डबा आणि एसएलआर याचा १ डबा असून, एकूण २२ कोचसह या दोन्ही ट्रेन चालवल्या जातात. आता ३ टियर इकॉनॉमी कोचचा एक कोच कायमस्वरुपी जोडण्यात आल्यावर या दोन्ही ट्रेन २३ कोचसह धावणार आहेत.