रत्नागिरी:- मनोरंजक आणि आनंददायी करण्यासाठी बाराखडीचे उच्चार संगितमय करुन इंटरॅक्टीव्ह चौदाखडी निर्मितीचा प्रयोग संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नारायण शिंदे यांनी अवलंबला आहे. एखादी आकडमोड किंवा विषय विद्यार्थ्यांना समजावून देणे सोपे झाले आहे.
कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र अद्यापही सुरु झालेले नाही; परंतु मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा बोजावारा अनेक ठिकाणी उडालेला आहे. तरीही काही शिक्षक त्या भागातही नेटाने काम करत शिकवण्या घेत आहेत. अनेक जण मुलांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी नवनवीन उपाय करत आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक नवनवीन संकल्पना राबवत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाडावेसराड येथील तंत्रस्नेही शिक्षक नारायण शिंदे यांनही असाच वेगळा प्रयोग शाळेत राबवला आहे. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नकोत, म्हणून तंत्रज्ञानाचा वापर ते करत आहेत. कृतीयुक्त शिक्षणातून मुलांना आनंददायी बनवण्यावर त्यांचा आतापर्यंत भर आहे. नेट सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरावी अशी वाचन गती वाढवणारी संगीतमय उच्चारासह इंटरॅक्टीव्ह चौदाखडी शिंदे या बनवली आहे. या चौदाखडीचे एकूण सात संच आहेत. ते सर्व एकत्र मिळावेत म्हणून त्याची पीडीएफ फाईल तयार केली आहे. याचा वापर फक्त त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यां पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्ह्यात व राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उपलब्ध करुन दिले आहेत. संगीतमय उच्चार हे त्याचे वेगळेपण आहे. या चौदाखडीचा वापर अंगणवाडीतील विद्यार्थीही करत आहेत. त्यामुळे वाचन करणे सोपे जात असून प्रत्येक गोष्टीचे आकलन विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उप शिक्षणाधिकारी संदेश कडव, गटशिक्षणाधिकारी त्रिभुवणे यांच्यासह विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनीही कौतुक केले आहे.