Friday, May 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोकण किनारपट्टीवरील ‘त्या’ गूढ आवाजांचे रहस्य उलगडले

कोकण किनारपट्टीवरील ‘त्या’ गूढ आवाजांचे रहस्य उलगडले

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

रत्नागिरी:- जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात गेल्या काही तासांपासून भीतीचे वातावरण पसरवणाऱ्या त्या गूढ आवाजांचे रहस्य अखेर उलगडले आहे. खोल समुद्रातून आलेल्या स्फोटासारख्या आवाजांमुळे किनारपट्टीवरील रहिवासी चिंतेत होते, मात्र पोलीस आणि तटरक्षक दलाने केलेल्या तातडीच्या तपासामुळे हे आवाज कोणत्याही संकटाचे नसून एका तांत्रिक प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माडबन ते विजयदुर्ग दरम्यानच्या परिसरात रात्रीच्या वेळी अचानक मोठ्या स्फोटांसारखे आवाज ऐकू आले. हे आवाज खोल समुद्रातून, साधारणपणे २० नॉटिकल माईल अंतरावरून येत असल्याचे जाणवत होते. शांत रात्रीच्या वेळी झालेल्या या आवाजांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने तपास यंत्रणांना सतर्क केले.

रात्रीपासूनच पोलीस यंत्रणा आणि तटरक्षक दल या आवाजांच्या मुळाशी जाण्यासाठी प्रयत्न करत होते. या शोधमोहिमेनंतर समोर आले की, त्या भागात खोल समुद्रातून एक मोठी ‘टग’ बोट जात होती. या बोटीवरून सिग्नल पिस्टलद्वारे फायर करण्यात आले होते. समुद्रात जहाजांकडून अनेकदा संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी किंवा तांत्रिक कारणांसाठी सिग्नल पिस्टलचा वापर केला जातो. या फायरींगमुळेच स्फोटासारखे आवाज निर्माण झाले होते, ज्याचा प्रतिध्वनी किनारपट्टीपर्यंत पोहोचला.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती देताना स्पष्ट केले की, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. समुद्रात झालेला तो आवाज कोणत्याही घातपाताचा किंवा संकटाचा नव्हता. केवळ सिग्नल पिस्टलच्या वापरामुळे ते आवाज आले होते. या घटनेनंतर परिसरात अफवांचे पेव फुटले होते, मात्र नागरिकांनी अशा कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून किनारपट्टीवरील जनजीवन सुरळीत आहे.