कसब्यातील देशमुख कुटुंबावर आघात
संगमेश्वर:- २२ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर कसबा येथील गजेंद्र देशमुख यांची अवघी १४ वर्षांची, आठवीत शिक्षण घेणारी कन्या मृण्मयी हिने अभ्यासाच्या कारणावरून आईने रागावल्याच्या भरात टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली होती. त्या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला होता. घरातील हास्य एका क्षणात विरून गेले होते. मुलीच्या अकाली जाण्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. यानंतर अवघ्या वर्षभरातच नियतीने दुसरा डाव टाकला आणि मुलीपाठोपाठ बापालाही मृत्यूच्या दाढेत ओढले.
मुलीच्या जाण्यानंतरचे दिवस म्हणजे त्या कुटुंबासाठी एक न संपणारी वेदना होती. प्रत्येक सकाळ मृण्मयीच्या आठवणीने सुरू व्हायची आणि प्रत्येक रात्र तिच्याच आठवणीने डोळे पाणावून जायचे. तरीही गजेंद्र देशमुख यांनी मनाचा धीर करून संसाराची गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. जणू काळाने पहिला घाव घातला होता, पण तो थांबला नव्हता जणू तो दबा धरूनच उभा होता.
या दुर्दैवी घटनेला वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना नियतीने पुन्हा एकदा निर्दयी वार केला. २० फेब्रुवारी रोजी गजेंद्र देशमुख हे त्यांच्या किराणा दुकानाच्या मालाची खरेदी करण्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते. नेहमीप्रमाणे व्यवहार उरकून ते दुचाकीवरून संगमेश्वर कसबा येथे परतत होते. आयुष्याचा रोजचा प्रवास करताना हा प्रवासच अखेरचा ठरेल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.
परतीच्या प्रवासात शाहूवाडी तालुक्यातील वालूर येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात पी झाला. काळाने यावेळी झडप घातली अचानक, निर्दयी आणि अपरिहार्य. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पन्नाशीही न ओलांडलेले गजेंद्र देशमुख यांनी मुलीच्या स्मृतीदिनी दोन दिवस आधीच कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला कायमचा निरोप दिला.
मुलीच्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबावर हा दुसरा घाव अधिकच असह्य ठरला. वर्षभरापूर्वी घरात झालेली शोकांतिका अजून ताजी असताना काळाने पुन्हा त्याच घराचा दरवाजा ठोठावला. “मुलीच्या पाठोपाठ बापाचेही जग सोडून जाणे” ही घटना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.
गावात शांत, कष्टाळू आणि मनमिळावू म्हणून ओळख असलेले गजेंद्र देशमुख हे आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र परिश्रम करणारे व्यक्तिमत्त्व होते. मुलीच्या जाण्याचे दुःख मनात दडवून त्यांनी जगण्याचा धीर धरला; मात्र नियतीने त्यांना अधिक काळ दिला नाही.
या दुहेरी आघातामुळे संगमेश्वर कसबा परिसरात शोककळा पसरली असून देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिक कुटुंबियांना धीर देण्यासाठी पुढे येत आहेत, पण काही जखमा शब्दांनी भरून निघत नाहीत.









