रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथील बोगद्यात काही दिवसांपुर्वी दरड कोसळली होती. त्यामुळे मडगावकडे जाणार्या सर्व रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या. त्या गाड्या मिरज मार्गे वळवण्यात आल्या. बोगद्यातील काम पूर्ण झाले असून हा मार्ग सुरळीत झाला आहे. कोरोनातील वेळापत्रकानुसार धावणार्या गाड्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. राज्यांतर्गत प्रवास सुरु करण्यासाठी मध्य रेल्वेने काही मोजक्याच गाड्या या मार्गावर सुरु केल्या. पेडणे बोगद्यातील काम पूर्ण झाल्यानंतर जाहीर झालेल्या गाड्या पुन्हा नेहमीप्रमाणे सुरु केल्या आहेत. त्यात एर्नाकुलम निजामुद्दीन स्पेशल एक्सप्रेस मडगांव ते कल्याण (02617), एर्नाकुलम स्पेशल एक्सप्रेस कल्याण मडगाव मंगलुरु (02618), निजामुद्दीन एर्नाकुलम दुरांतो स्पेशल एक्सप्रेस पनवेल मंगलुरू (02284), नवी दिल्ली तिरुवनंतपूरम राजधानी एवसप्रेस (02432 / 02431), लोकमान्य टिळक ते तिरुवनंतपुरम स्पेशल एक्सप्रेस (06345/06346) या गाड्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.









