मासू येथील पाच एकर फळबाग आगीत खाक

गुहागर:- तालुक्यातील मासू येथील प्रगतशील शेतकरी मनोज भोजने यांच्या फळबागेला अज्ञाताने लावलेल्या भीषण आगीत त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या या फळबागेतील हापूस आंबा, काजू आणि पोकळीची शेकडो झाडे या आगीत जळून खाक झाली आहेत. ही आग नैसर्गिक नसून जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय भोजने यांनी व्यक्त केला आहे.

या आगीत अंदाजे १०० आंब्याची झाडे, ५० पोकळीची झाडे तसेच सुमारे ५०० काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. संबंधित शेताचे एकूण क्षेत्र सुमारे पाच एकर असून या आगीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

मनोज भोजने यांनी अनेक वर्षांच्या परिश्रमातून ही पाच एकरची फळबाग उभी केली होती. ही आग नैसर्गिक कारणांमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसून, ती कोणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचा दाट संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे भोजने यांचे केवळ आर्थिकच नव्हे, तर मोठे कष्टही वाया गेले आहेत.

भरपाईची मागणी आणि तक्रार या घटनेची गांभीर्याने दखल घेत मनोज भोजने यांनी कृषी अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी येऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि शासनाकडून विशेष आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून केली जात आहे.

परिसरातील प्रगतशील शेतकऱ्याच्या फळबागेला अशा प्रकारे लक्ष्य केल्यामुळे गुहागरमधील शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण असून, दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.