रत्नागिरी तालुक्याचा ‘कौल’ आज ठरणार; सकाळी १० पासून मतमोजणी

गोळपचा निकाल सर्वात आधी, तर वाटदचा शेवटी

रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रत्नागिरी तालुक्याची मतमोजणी आज सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सामाजिक न्याय भवन येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतमोजणीच्या फेऱ्यांचे सविस्तर नियोजन जाहीर करण्यात आले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. तर गोळप, खेडशी गटाचा निर्णय सर्वात पहिला तर वाटद गटाचा निर्णय सर्वात शेवटी लागण्याची शक्यता आहे.

मतमोजणीच्या एकूण प्रक्रियेमध्ये विविध गणांचा समावेश असून, प्रत्येक फेरीनुसार मतमोजणीची विभागणी करण्यात आली आहे. अकरावी फेरी ही प्रामुख्याने गोळप, कळझोंडी, खालगांव आणि खेडशी या गणांसाठी असेल. त्यानंतरच्या बाराव्या फेरीत फणसवळे, नाचणे, भाटये आणि गावखडी या भागांतील मतपेटींमधील कौल स्पष्ट होईल.

टप्याटप्यात नाणिज, कर्ला, साखरतर आणि झाडगांव (म्यु. बाहेर) या गणांचा निकाल १३ व्या फेरीअखेर समोर येण्याची शक्यता आहे. चौदाव्या फेरीमध्ये हातखंबा, कुवारबांव, हरचिरी आणि पावस या महत्त्वाच्या गणांची मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १५ व्या आणि १६ व्या फेरीत कोतवडे, करबुडे आणि नेवरे या गणांचा निकाल जाहीर होईल. सर्वात अखेरची म्हणजे १९ वी फेरी ही वाटद गणासाठी राखीव ठेवण्यात आली असून, याच फेरीनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. प्रशासनाने प्रत्येक गणासाठी स्वतंत्र टेबल आणि फेरी क्रमांक निश्चित केल्यामुळे मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा आहे.

पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे.तर वाहन पार्कींगची व्यवस्था अन्य ठिकाणीकरण्यात आली आहे.