नगरसेवक- पदाधिकारी वादात सफाई कर्मचाऱ्यांची कोंडी

सेना पदाधिकाऱ्याची दबंगगिरी; नगराध्यक्षांकडून तोडगा

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सफाई कामगारांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मी सांगेन त्या प्रभागातच सफाईसाठी जायचे, असा दम सेना पदाधिकाऱ्याने सफाई कर्मचाऱ्यांना भरल्याने शिवसेना आणि भाजप सत्ताधारी नगरसेवकांची पंचाईत झाली आहे. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वादात सफाई कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. अगदी काही कर्मचारी या दडपणाखाली काम न करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे पुढे आले आहे. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्याकडे हा विषय गेला. नियमित कर्मचाऱ्याचे वाटप जसे होते तसे समान सफाई कर्मचारी द्या, असे स्पष्ट आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

रत्नागिरी पालिकेवर शिवसेना आणि भाजप महायुतीची निर्विवाद सत्ता आहे. सत्तेत बसल्यापासूनच पालिकेच्या विविध कारभाराचे किस्से बाहेर येऊ लागले आहेत. पालिकेत निवडून गेलेल्या नगरसेवकापेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीच दादागिरी वाढल्याचा आरोप करत याबाबत भाजपच्या नगरसेवकांनी थेट नगराध्यक्षांकडे तक्रार केली आहे. निवडणुकीत पडलेल्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या प्रभागात सफाई कर्मचारी पाठवले जातात. मग आम्ही मागूनही आमच्या प्रभागात का दिले जात नाहीत? याबाबत संबंधित महिला नगरसेविका थेट नगराध्यक्षांना भेटल्या, तेव्हा आरोग्य विभागाचे अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्याच्या मुकादमांना बोलावण्यात आले. मी सांगेन त्या प्रभागात सफाईसाठी जायचे, असा दम एका शिवसेना पदाधिकाऱ्याने दिल्याचे सफाई कर्मचाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सफाई कर्मचारी पाठवले असे त्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांपुढे स्पष्ट केले. नगरसेवक आणि सेना पदाधिकारी यांच्या वादामुळे आता सफाई कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. याला कंटाळून सफाई कर्मचारी नोकरी सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याचेही सांगण्यात आले. यावर नगराध्यक्षा सुर्वे यानों स्पष्ट भाषेत सांगितले की, मी सांगतेय की, सफाई कर्मचाऱ्यांचे साहित्य प्रभागनिहाय वाटप करा. बाकी कोणाचे ऐकण्याची गरज नाही. जर अशी कोणी तंबी देत असेल तर लेखी स्वरूपात द्या, असे सांगून यावर तोडगा काढण्यात आला. यापूर्वी शौचालय घोटाळा बाहेर आला, त्यानंतर पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात वाद झाल्याने बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निलंबित करण्याचा ठराव झाला. प्लास्टिकमुक्तीच्या जनजागृतीसाठी देण्यात आलेले कापडी पिशव्यांचे मशिन सार्वजनिक ठिकाणी न बसवता चक्क शौचालयात बसवण्याचा अजब कारभार पुढे आला त्यानंतर मंजुरीपूर्वीच विकासकामे पूर्ण केल्याची तक्रार माजी नगराध्यक्षांनी केली.

पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक

पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दोन महिने सफाई कर्मचार्‍यांचा पगार नाही. त्यांची मनधरणी करून आश्वासन देऊन शहरातील सफाईचे काम सुरु आहे. अशी परिस्थिती असताना आता वेगळाच प्रकार पुढे आत आहे.