लग्नाचा मांडव सोडून थेट मतदान केंद्रावर; रत्नागिरीत नववधूने जपले लोकशाहीचे कर्तव्य

रत्नागिरी:- एकीकडे लग्नाची लगबग, मंगल अक्षतांची तयारी आणि विवाहाचा शुभमुहूर्त जवळ आलेला असताना, रत्नागिरीतील एका नववधूने आपल्या आयुष्यातील मोठ्या निर्णयापूर्वी देशासाठीचे कर्तव्य पार पाडण्याला प्राधान्य दिले. पूजा राजेंद्र गुरव या नववधूने बोहल्यावर चढण्यापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत रत्नागिरीतील गणेशगुळे ग्रामपंचायत बूथवर आज सर्वत्र याच चर्चेचा विषय होता. पूजा गुरव यांचा आज विवाह सोहळा संपन्न होत आहे. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर हजेरी लावली.

​हातात मेहंदी, अंगावर लग्नाचा भरजरी पेहराव आणि दागिन्यांनी नटलेल्या पूजा जेव्हा मतदान केंद्रावर पोहोचल्या, तेव्हा उपस्थित सर्वजण थक्क झाले. विवाहाच्या धावपळीत मतदानाकडे दुर्लक्ष न करता, त्यांनी रांगेत उभे राहून आपले मत नोंदवले. मतदान हा केवळ अधिकार नसून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी लोकशाही बळकट करण्यासाठी मी माझे योगदान दिले याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया नववधू पूजा गुरव हिने दिली.

पूजा यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी निर्णयाचे निवडणूक निर्णय अधिकारी, उपस्थित कर्मचारी आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. “आजच्या तरुण पिढीने पूजाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

रत्नागिरीतील हा प्रेरणादायी क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी या घटनेचा मोठा सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.