नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

मिऱ्याबंदर ते आंबा घाटापर्यंत ८० टक्के काम पूर्ण, मे अखेरपर्यंतचे लक्ष्य

रत्नागिरी:- कोकण आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम आता प्रगत टप्प्यावर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील मिऱ्याबंदर ते आंबा घाटापर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०२६ अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र, उर्वरित कामाचा आवाका पाहता संबंधित ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.

महामार्गावरील आंबा ते चोकाक दरम्यानचे काम आतापर्यंत ६३ टक्के पूर्ण झाले आहे. या टप्प्यात मोठे डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत, तसेच मार्गातील तीव्र वळणे काढली जात आहेत. या तांत्रिक कामांमुळे प्रकल्पास विलंब होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मे अखेरपर्यंतची मुदत असली, तरी काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन महिने मुदतवाढ मिळू शकते, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात आंबा घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. पर्यटकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सध्या आंबा घाटात दोन्ही बाजूंना संरक्षक जाळ्या लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील रत्नागिरी मिऱ्याबंदर ते आंबापर्यंतच्या कामात आता केवळ किरकोळ कामे शिल्लक राहिली आहेत.

दरम्यान, नागपूर ते सांगलीपर्यंतचा रस्ता यापूर्वीच पूर्ण झाला आहे, मात्र सांगली ते कोल्हापूर टप्प्यातील काम काहीसे रखडले होते. आता चोकाक परिसरातील भूसंपादनाचा तांत्रिक पेच सुटल्याने या कामालाही गती मिळणार आहे. चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

दोन ठिकाणी होणार टोल वसुली
महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली सुरू केली जाईल. यासाठी पन्हाळा तालुक्यातील ‘आवळी’ आणि हातकणंगले तालुक्यातील ‘शिरोली- बसवनखिंड’ येथे टोलनाके उभारले जाणार आहेत. रस्ता पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतरच या दोन्ही नाक्यांवरून अधिकृत वसुली सुरू होईल.