रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, समुद्रकिनारे गजबजले
रत्नागिरी:- शनिवार, रविवार आणि त्याला जोडून प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा महापूर लोटला आहे. जिल्ह्यातील गणपतीपुळे, गुहागर आणि दापोलीसह छोट्या-मोठ्या किनाऱ्यांवर पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसात पर्यटन व्यवसायातून कोटीच्या घरात उलाढाल झाली आहे.
सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्यामुले मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच पुणे जिल्ह्यासह कर्नाटकातील पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरीत दाखल झालेले आहेत. गेल्या काही दिवसात कोकणातील वातावरणही थंड असल्याने पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गणपतीपुळे, मालगुंड, भाट्ये, आरे-वारे, गुहागर, वेळणेश्वर, दापोलीतील मुरूड, कर्दे, लाडघर आणि हर्णे या पर्यटन स्थळांवर अधिक राबता आहे. पर्यटक समुद्रस्नानाचाच नव्हे, तर वॉटर स्पोर्ट्सचाही मनसोक्त आनंद घेतला. बनाना राईड, बंपर राईड, जेट स्की आणि पॅरासेलिंग यांसारख्या साहसी खेळांना पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे. बच्चे कंपनीने घोडसवारी आणि उंट सफारीचा आनंद लुटत असून पर्यटकांच्या या मोठ्या ओघामुळे जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉजेस आणि ‘होम स्टे’ फुल्ल झालेले आहेत. दिवाळीनंतर थंडावलेल्या पर्यटन हंगामाला या सलग सुट्ट्यांमुळे पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.
पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांनी बाहेर पडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट, चिपळूण आणि संगमेश्वर परिसरात काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला होता. रत्नागिरी शहरात येणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तासनतास कोंडीत अडकल्यामुळे काही वाहनचालक वैतागलेले दिसले, तरीही पर्यटनाचा उत्साह कमी झालेला नाही.









