जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

रत्नागिरी:- रत्नागिरीचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर जोरदार फटकेबाजी केली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच, त्यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या बंडखोरीवर बोलताना सामंत म्हणाले की, “ज्यांनी बंडखोरी केली आहे, ते सर्व अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी पक्षात आलेले लोक आहेत. जे पहिल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निष्ठेने उभे आहेत, अशा एकाही व्यक्तीने बंडखोरी केलेली नाही.” कोकरे जिल्हा परिषद गटातील किशोर घाग यांच्या बंडखोरीचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ज्यांना पक्षाची विचारधाराच समजली नाही, त्यांनीच ही पावले उचलली आहेत. माझ्या मतदारसंघातही जी बंडखोरी झाल्याची चर्चा आहे, त्याचे सत्य निवडणुकीनंतरच जनतेसमोर येईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

देवरुखमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याच्या प्रश्नावर सामंत यांनी सावध भूमिका घेतली. “भाजप तिथे स्वतंत्र का लढत आहे, याची मी सविस्तर माहिती घेईन. जिथे गरज पडेल तिथे आम्ही भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देऊ,” असे संकेत त्यांनी दिले. महायुतीमधील समन्वय बिघडू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नगरपरिषदेतील ‘त्या’ मुजोर अधिकाऱ्याची खैर नाही
रत्नागिरी नगर परिषदेतील शाळा बांधकाम प्रकरणावरून उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यांच्यात झालेल्या वादाची मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. “प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याने जर लोकप्रतिनिधीच्या अंगावर धावून जाण्याची मस्ती केली असेल, तर त्याची केवळ बदली नाही, तर त्याला थेट निलंबित केले जाईल,” असा इशारा सामंत यांनी दिला. या प्रकरणाची माहिती मुख्याधिकाऱ्यांकडून घेतली असून, सर्व नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर दोषीवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.