जिल्हा परिषदेसाठी २०२; पंचायत समितीसाठी ४३१ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी नऊ तालुक्यांमध्ये करण्यात आली. या छाननीत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आलेल्या एकूण २२४ अर्जांपैकी २०२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आलेल्या एकूण ४४४ अर्जांपैकी ४३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. २७ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक लढविणार, हे निश्चित होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. मुदतीअंती जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी २२६ अर्ज आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४४४ अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही निवडणुकीसाठी अर्ज करताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरले होते. मात्र, गुरुवारी छाननीवेळी एक अर्ज ग्राह्य धरून उर्वरित अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच काहींच्या अर्जात त्रुटी असल्याने अशा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

त्यामुळे जिल्ह्यात ५६ गणांसाठी २०२ उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात आहेत. यात १०७ पुरुष, तर ९५ महिला आहेत. तसेच ११२ गणांमध्ये ४३१ उमेदवार पंचायत समितीची निवडणूक लढविणार आहेत. यात २४३ पुरुष आणि १८८ महिला उमेदवार आहेत.

२५ रोजी रविवार आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन असल्याने सुटी आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याची २७ जानेवारी अंतिम तारीख आहे. त्यामुळे या वैध ठरलेल्या उमेदवारांमधून किती उमेदवार अर्ज माघारी घेणार आणि किती रिंगणात राहणार, हे या दिवशी स्पष्ट होणार आहे.