लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा प्रभावी पर्याय 

रत्नागिरी:- लक्षणे नसलेल्या, परंतु कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन करण्याचा पर्याय अनेक जणं निवडत आहेत. जिल्ह्यातील 203 बाधित रुग्ण घरच्या घरीच उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोविड रुग्णालयासह जिल्ह्यातील अन्य उपचार केंद्रांवरील भार वाढत आहे. त्यासाठी होम आयसोलेशनवर भर देण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात कोरोनाचे रुग्णांचा आकडा वाढत आहे. टाळेबंदी उठवल्यानंतर दिवसाला दिडशे ते दोनशे बाधित सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयासह विविध उपचार केंद्रांवर भार वाढू लागला आहे. भविष्यात हा आकडा वाढण्याची भिती आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी अ‍ॅण्टीजेन चाचण्यांवर भर दिला गेला आहे. त्यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यासाठी कोविड केंद्रही अपुरी पडत आहेत. लक्षणे असलेल्यांवर उपचार किंवा ऑक्सीजन अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागही लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरच्या घरी उपचारासाठी सकारात्मक आहे.

होम आयसोलेशनची संकल्पना 15 ऑगस्टपासून अमलात आणण्यास सुरवात झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 203 बाधित रुग्णांवर घरच्या घरीच उपचार सुरु आहेत. सरकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचार, अल्पोपहार, भोजन व पुरक सेवा व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे पर्याय म्हणून होम आयसोलेशनमध्ये वैद्यकीय सेवा विकसीतचा प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यक रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करत आहेत. येथे नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. यामध्ये अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रुग्णाची प्रकृती खालावत असल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येते.  कोणतीही लक्षणे नसलेल्या संबंधित रूग्णाच्या घरी खोली, शौचालय, बाथरूम स्वतंत्रपणे असेल तर त्याला घरी उपचार करणे शक्य आहे. त्या रुग्णाच्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेविकांद्वारे रूग्णावर उपचार होतात. रोज रूग्णाच्या घरी भेट देवून तपासणी व औषधे दिली जातात.

बाधित रुग्णाला ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल तर संबंधितावर घरच्या घरीच उपचार केले जात आहे. शहरापासून जवळच्या गावांमध्ये याला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात रुग्ण वाढल्यास लक्षणे नसलेल्यांवर घरीच उपचारासाठी ठेवण्यावर भर दिला जाईल. – डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा शल्य चिकित्सक