Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी नगर पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा

रत्नागिरी नगर पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा

बोगस कामे दाखवून लाटले पैसे, अनेक अधिकारी अडचणीत

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेवर ६५ कोटी रुपयांचे कर्ज असताना रत्नागिरी नगर पालिकेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि भाजपचे धडाडीचे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी नगरपालिकेतील तब्बल ४ कोटी रुपयांचा ‘शौचालय घोटाळा’ अत्यंत धाडसाने उघडकीस आणला आहे. “कर्मचाऱ्यांनी बोगस कामे करून पैसे लाटायचे आणि त्याची शिक्षा मात्र कररूपाने सामान्य नागरिकांना द्यायची,” असा सडेतोड आरोप तिवरेकर यांनी केल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

समीर तिवरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात एकूण ८० सार्वजनिक शौचालये आहेत. गेल्या चार वर्षांत नगरपालिकेवर लोकप्रतिनिधी नसताना म्हणजेच ‘प्रशासक राजवटी’त या शौचालयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

तिवरेकर यांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता, दुरुस्तीसाठी वापरलेली १००० रुपयांची वस्तू चक्क ५००० रुपये दाखवून बिले काढण्यात आली आहेत. एकाच शौचालयाच्या दुरुस्तीच्या नावावर दोन ते तीन वेळा खर्च टाकून पैसे लाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व बिले पास होऊन पैसे देखील दिले गेले आहेत. कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च होऊनही आजच्या घडीला शहरातील शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. काम न करताच बिले लाटल्याचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

एकीकडे हा भ्रष्टाचार सुरू असताना दुसरीकडे नगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. समीर तिवरेकर यांनी धक्कादायक वास्तव मांडताना सांगितले की, “आजच्या घडीला नगरपालिकेच्या खात्यात फक्त १२ लाख रुपये शिल्लक आहेत, तर पालिकेला कंत्राटदार आणि इतरांचे तब्बल ६५ कोटी रुपये देणे बाकी आहे.” कर्मचाऱ्यांनी केलेल्या या उधळपट्टीचा ६५ कोटींचा बोजा आता रत्नागिरीतील सामान्य नागरिकांवर कर वाढीच्या स्वरूपात पडणार आहे.

प्रशासक राजवटीत अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप तिवरेकर यांनी केला आहे. ते म्हणाले, “मला रत्नागिरीचा विकास करायचा आहे आणि मी जनतेसाठी लढणार आहे. या घोटाळ्याशी संबंधित निविदा आणि कागदपत्रे मी जमा करत असून, प्रत्येक शौचालयाची सध्याची परिस्थिती काय आहे, याची पाहणी करून हा घोटाळा मी तडीस नेणार आहे.”

समीर तिवरेकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे नगरपालिकेतील अनेक बडे अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता असून, या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण रत्नागिरीचे लक्ष लागले आहे.