उदय बने अपक्ष लढणार की उबाठा बनेना पाठिंबा देणार?

गोळप जि.प. गटात उमेदवारीवरुन रस्सीखेच

रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या बैठका सुरू झाल्या आहेत, दुसरीकडे काही गटांमध्ये इच्छुकांनी सुरू केलेल्या कामांमुळे जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे.

गोळप हा गट शिवसेनेचा (उबाठा) बालेकिल्ला आहे. परंतु जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि २८ वर्ष शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे उदय बने येथून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या गटातून ते लढतात तेथून ते निवडून येतात, अशी त्यांची ख्याती आहे.

शिवसेनेकडुन (शिंदे गट) इच्छुक असलेले नंदा मुरकर आणि उदय बने यांच्यात तेथे जोरदार टक्कर होणार आहे. त्यात उबाठा इथे आपला उमेदवार न देता उदय बने यांना आतून पाठिंबा देणाचा डाव टाकणार असल्याने त्यात अधिकच चूरस वाढणार आहे.
जिल्हा परिषदेच्या पाच निवडणुका गाजवलेले उदय बने यांनी १९९७ पासून शिवसेना या पक्षात विविध पदांवर काम केले आहे. आता मात्र ते ही सहावी जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे बने यांनी सांगितले. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात एकच गदारोळ उठला आहे. बने गोळप जिल्हा परिषद गटातून ही निवडणूक लढवणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फेररचनेनंतर त्यांचे मुळ गाव निरूळ आता गोळप जिल्हा परिषद गटात समाविष्ट झाले आहे. आता ते याच गटातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोळप जिल्हा परिषद गटात निरूळ गावासह कोळंबे, तोणदे, भाट्ये, फणसोप, चांदोर, गणेश गुळे आणि गोळप या गावांचा समावेश आहे. आपली सहावी जिल्हा परिषद निवडणूक ही अखेरची निवडणूक आपण अपक्ष लढवणार असल्याचे बने यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या इतिहासात उदय बने नविन चमत्कार घडवणार का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागुन राहिले आहे.

परंतु येथे पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्ती नंदा मुरकर हे गोळप गटासाठी इच्छुक आहेत. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू केले असून मंत्री सामंत यांनी या गटाला भरभरून निधी देखील दिला आहे. या गटात काही बैठका देखील झाल्या आहेत. हा गट उबाठाचा बालेकिल्ला आहे. परंतु सेनेतील फुटीमुळे तेथे मतांचे विभाजान झाले आहे. व्यक्तीकद ओळख आणि पक्षाच्या पाठिंबावर उमेदवार तेथे बाजी मारणार आहे. उदय बने यांनी उबाठा सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर ते कोणत्याही राजकीय प्रवाहात नाहीत. परंतु ते आता स्वतंत्र निवडणुक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गोळप गटामध्ये उदय बने विरुद्ध नंदा मुरकर असा सामना रंगण्याची चिन्ह आहे. मात्र उबाठाने खेळ करून तिथे उमेदवार न देता उदय बनेंना छुपा पाठिंबा दिला तर बने यांचे पारडे जड होणार आहे, असे चित्र आहे.