बेपत्ता वृद्धाचा मृतदेह नदीपात्रात आढळला

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे-राजीवली परिसरातील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ९५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह संशयास्पद रितीने आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शाहू तुकाराम शिर्के (वय ९५ वर्ष, रा. राजीवली शिर्केवाडी) असे या मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहू शिर्के हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात यापूर्वीच करण्यात आली होती. सोमवारी, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास तुरळ हरेकरवाडी स्मशानभूमी समोरील तुरळ-कडवई नदीपात्रामध्ये ‘कापाचा डोह’ येथे एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. तुरळ हरेकरवाडीचे पोलीस पाटील यांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता, मात्र घटनास्थळी आलेल्या मृतकाचा मुलगा तुकाराम शाहू शिर्के यांनी शरीराची ठेवण आणि अंगावरील कपड्यांवरून हा मृतदेह त्यांचे वडील शाहू शिर्के यांचाच असल्याची खात्री केली. हा मृत्यू दि. ३०/१२/२०२५ ते १३/०१/२०२६ या दरम्यान झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संगमेश्वर पोलिसांनी याप्रकरणी १३ जानेवारी रात्री ८. २० वाजता बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.