रत्नागिरी:- तालुक्यातील चिंद्रवली-कोंडवी वाकणजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक मिनी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. मोहनेश चंद्रम बडगेर (वय ३२, रा. कर्नाटक) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार, वळणावर गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व जखमी हे रस्त्याचे काम करणारे मजूर असून ते सध्या हरचेरी या ठिकाणी वास्तव्यास होते. बुधवारी दुपारी हे सर्व कामगार मिनी बसने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पाली येथील बाजारपेठेत आले होते. खरेदी आटपून ही बस पुन्हा हरचेरीच्या दिशेने परतत असताना चिंद्रवली-कोंडवी येथील धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने ही बस थेट दरीत कोसळली.
या अपघाताच्या वेळी चालकाच्या शेजारी बसलेला मोहनेश बडगेर हा गाडीबाहेर फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बसमधील अन्य १० प्रवाशांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली होती.









