जाकादेवी येथील घटना; भक्षाच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील एका विहिरीत नर जातीच्या बिबट्याचा विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बिबट्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने मागील पाच ते सहा दिवसांपुर्वी हा बिबट्या विहिरी पडलेला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
खालगांव जाकादेवी येथील श्री. वळवी हे आपल्या खाजगी कामानिमित्ताने आठ- दहा दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. घरमालक घरी नसल्यामुळे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना अनेक दिवस कोणाच्याही लक्षात आली नाही. परिसरातील कामगारांना पाच सहा दिवसानंतर परिसरात पसरलेल्या दुर्गंधीच्या वासामुळे बिबट्या विहिरीत पडल्याचे उघडकीस आले.
हा बिबट्या भक्ष्यांच्या शोधात असताना विहिरीची साधी जाळी बिबट्याच्या वजनाने फाटून तो खोल विहिरीत पडला असावा. हा बिबट्या सात ते आठ वर्षांचा नर जातीचा असून याविषयी वन विभागाला कळविण्यात आले. परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनरक्षक विभागाचे एन. एस. गावडे, शर्वरी कदम यांच्या मदतीला खालगाव जाकादेवी येथील सेवाभावी ग्रामस्थ, तरूणांनी शर्तीचे प्रयत्न करून खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या शवाची तपासणी केली असता त्याचे शवविच्छेदन करणे शक्य नसल्याने ते जाळून नष्ट करण्यात आले.









