रत्नागिरी:- खवल्या मांजरासह मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्या अटकेतील ८ संशयित आरोपींची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. प्रत्येकी १५ हजार रूपयांचा जामिन न्यायालयाने मंजूर केला आहे. या संशयित आरोपींना ९ सप्टेंबर रोजी शहर पोलिसांनी काजरघाटी उतारात अटक केली होती.
बुधवारी शहर पोलिसांनी खवल्या मांजरासह मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. तब्बल ८ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. शहरासह ग्रामीण भागातील मंडळी यात सहभागी होती. त्यामुळे याची पाळेमुळे खोदून काढणे पोलिसांसमोर आव्हान उभे होते.
याप्रकरणात पोलिसांनी रणजित सुरेंद्र सावंत (वय ३८, रा. झाडगांवनाका, रत्नागिरी), सुनील अनंत देवरूखकर (वय ३४, रा. पोचरी, सोनारवाडी संगमेश्वर), ओमकार राजेश लिंगायत (वय २४, गुरववाडी, खानू मठ लांजा), दीपक दिनकर इंगळे (वय २४, कणगवली, वेरळ लांजा), संदेश रामचंद्र मालगुंडकर (वय ३९, धामापूर, धारेवाडी संगमेश्वर), दिनेश आत्माराम मोंडे (वय २९, आडिवरे, कालिकावाडी राजापूर), प्रमोद वसंत कांबळे (वय ३९, कांबळेवाडी, कारवांचीवाडी रत्नागिरी), लक्ष्मण बबन नाडे (वय ४९, धामणी संगमेश्वर) यांना वन्य जीव प्राणी संरक्षण कायदा कलम ३९, ४४, ४८, ४८(अ), ५१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती.
त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत शनिवारी संपताच त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांची प्रत्येकी १५ हजार रूपयांच्या जामिनावर सुटका केली. संशयित आरोपींच्यावतीने ऍड. मनिष नलावडे, ऍड. सचिन थरवळ, ऍड. महेंद्र मांडवकर, ऍड. मुदस्सर डिंगणकर यांनी काम पाहिले.









