कोंडये येथील वृध्दाची गळफासाने आत्महत्या

संगमेश्वर:- कोंडये गावात एक अत्यंत हळहळजनक घटना घडली असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कोंडये देसाईवाडी वरचामाळा येथे वास्तव्यास असलेले रमेश विनायक देसाई (वय ८२) यांनी मंगळवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आपल्या राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले.

रमेश देसाई यांनी घरातील माळ्याच्या लाकडी भाल्याला काळ्या रंगाची जाड कापडी पट्टी बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती कोंडये गावचे पोलीस पाटील विजय यशवंत शिंदे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ०२/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे.

कोणालाही कसलीही पूर्वसूचना किंवा कल्पना न देता त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला, याबाबत कुटुंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

रमेश देसाई हे गावात शांत, मनमिळावू आणि सर्वांशी स्नेहाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अचानक जाण्याने कोंडये गाव सुन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन डॉ. मोरे यांनी केले. अकस्मात मृत्यूचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकारी, देवरुख यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.