राजापूर:- सागवे-देवगड मार्गावरील घोडेपोईतील तीव्र उतारावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रदीप शिवप्रसाद (२३, मूळ उत्तरप्रदेश, सध्या रा. नाणार, ता. राजापूर) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवप्रसाद हा १६ डिसेंबर रोजी सायं. ५.३० च्या सुमारास दुचाकी घेवून चिकन आणण्यासाठी कात्रादेवी- सागवे येथे गेला होता. तेथे गणेश रमेश घाडी (३८, रा. तिर्लोट, भाकरवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) याने प्रदीपला मला आंबेरी येथे घरी सोडून येण्यास सांगितले. त्यामुळे प्रदीप हा घाडीला डबल सिट घेवून आंबेरीत जात असता घोडेपोईत प्रदीपचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात शिवप्रसादला गंभीर दुखापत झाल्याने सिंधुदुर्ग-ओरोस येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना १८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रदीपविरोधात स्वतःच्या मृत्यूस तसेच घाडीच्या दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी १ जानेवारीला राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.









