‘निरोप २०२५ ला, स्वागत २०२६’ चे; भाट्ये समुद्रकिनारी पर्यटकांचा महापूर

सरत्या वर्षाच्या अखेरच्या सूर्यास्ताचे साक्षीदार होण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी

रत्नागिरी:- सरत्या २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवोदित २०२६ वर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीचा निसर्गरम्य भाट्ये समुद्रकिनारा पर्यटकांनी अक्षरशः ओसंडून वाहू लागला आहे. आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी सूर्यास्ताचा मनोहारी सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी रत्नागिरीकरांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

राज्याच्या विविध भागांतून पर्यटकांचे आगमन
कोकणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील हॉटेल्स, लॉज आणि होमस्टे ‘हाऊसफुल्ल’ झाले असून, पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे.

आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने भाट्ये किनाऱ्यावर दुपारपासूनच पर्यटकांचा ओघ सुरू झाला होता. क्षितिजावर मावळणाऱ्या २०२५ च्या शेवटच्या सूर्यकिरणांना निरोप देताना अनेक पर्यटक भावूक झाले होते, तर त्याच उत्साहात २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘सेल्फी’ आणि जल्लोषात तरुण पिढी मग्न दिसून आली.

पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेता रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या वतीने भाट्ये समुद्रकिनारी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, अतिउत्साही पर्यटकांवर आणि मद्यपींवर पोलिसांची करडी नजर आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून ​पर्यटकांचा ओघ दिसून येत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी समुद्रकिनारी विशेष सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनामुळे स्थानिक व्यावसायिक, घोडागाडी चालक आणि खानावळींना सुगीचे दिवस आले आहेत.