कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेची अभूतपूर्व सज्जता
रत्नागिरी:- सरत्या २०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सन २०२६ या नववर्षाचे भव्य स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या कोकणात, विशेषकरून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या मोठ्या जल्लोषाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने जिल्हा पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांना आवाहन केले आहे की, त्यांनी नववर्षाचा सोहळा पूर्ण आनंदात साजरा करावा, पण त्याच वेळी सर्वांनी योग्य खबरदारी घेऊन दक्षता बाळगावी. उत्साहाच्या भरात होणारी हुल्लडबाजी, अतिउत्साह आणि कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन टाळण्यासाठी पोलीस दल ‘अलर्ट’ मोडवर आले आहे.
आज, मंगळवार ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील चारही उपविभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश आहे. यासोबतच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि त्वरित प्रतिसाद पथके देखील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. यावर्षीही मोठी गर्दी असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने खबरदारी म्हणून पूर्ण तयारी केली आहे. विशेषतः दापोली, गणपतीपुळे, गुहागर यांसारख्या प्रमुख पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रवासाचे सुलभ नियमन करण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी धोकादायक सागरी किनारी पोलीस यंत्रणेकडून सतत सूचना दिल्या जात आहेत. पर्यटकांनी पाण्यात उतरताना विशेष खबरदारी घ्यावी, पाण्याची खोली आणि समुद्राच्या लाटांचा अंदाज घ्यावा आणि कोणताही आततायीपणा किंवा धाडस करणे टाळावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले आहे. सुरक्षिततेसाठी सागरी रक्षक दल, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांचीही मदत घेण्यात येत आहे. एवढेच नाही, तर बाणकोटपासून दाभोळ, मिरकरवाडा ते नाटेपर्यंत सागरी हद्दीत गस्ती बोटींद्वारे किनारपट्टीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
नववर्षाच्या पार्ट्यांच्या निमित्ताने होणारे मद्यधुंद ड्रायव्हिंग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी ‘ब्रेथ अॅनालायझर’ या उपकरणाच्या मदतीने वाहनचालकांची कसून तपासणी केली जाईल. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिला आहे. तसेच, सोशल मीडियावर नववर्षाच्या निमित्ताने समाजात तेढ निर्माण करणारे किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ, संदेश टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठीही एक विशेष सायबर पथक लक्ष ठेवून असणार आहे.









