मयत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- तालुक्यातील कुचांबे ते आरवली दरम्यान कुचांबे थेराडेवाडी पुलावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुचाकीवर मागे बसलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. वेगात असलेली दुचाकी घसरून समोरून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकावर आदळल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० ते ११:४५ च्या सुमारास सुशांत सुरेश कदम (रा. कुचांबे बौद्धवाडी) हा आपली मोटारसायकल घेऊन कुचांबे येथून आरवलीच्या दिशेने जात होता. त्याच्या दुचाकीवर मागे प्रताप दिलीप कदम हा बसलेला होता. कुचांबे थेराडेवाडी गावच्या पऱ्याच्या पुलाजवळ रस्ता वळणाचा आणि चढ-उताराचा असताना, सुशांतने दुचाकी अतिवेगात चालवली होती.
त्याच वेळी समोरून आरवलीकडून येणारा मालवाहू ट्रक (क्रमांक MH 08 H 0845) पाहून सुशांतने अचानक ब्रेक लावला. रस्ता निसरडा असल्याने आणि वेग जास्त असल्याने दुचाकी जोरात स्लीप झाली आणि घसपटत जाऊन ट्रकच्या उजव्या बाजूच्या मागील टायरवर आदळली.
या धडकेत सुशांत कदम याच्या शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला प्रताप दिलीप कदम हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. मयत चालक सुशांत कदम याने रस्ता वळणाचा असतानाही परिस्थितीचा अंदाज न घेता, हयगयीने आणि अतिवेगात दुचाकी चालवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(ए), १२५(बी) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









