रत्नागिरी पोलीस दलाची मोठी कारवाई; पुणे येथे १८१ किलो अंमली पदार्थांचा नाश

रत्नागिरी:- जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कार्यवाही केली आहे. २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत ६५ विविध गुन्ह्यांत जप्त केलेला १८१ किलो अंमली पदार्थांचा साठा पुण्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली.

पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार, ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘ड्रग्ज डिस्पोजल समिती’ स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, तर सदस्य म्हणून अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके यांचा समावेश आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने न्यायालयाकडून रीतसर परवानगी घेऊन एकूण १८१ किलो १४१ ग्रॅम मुद्देमालाचा नाश केला. यामध्ये गांजा ८२ किलो ९८१ ग्रॅम, चरस ९७ किलो ८९९ ग्रॅम, ब्राऊन हेरॉइन २५२ ग्रॅम, एम.डी. ९ ग्रॅम यांचा समावेश होता.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मान्यतेने, २६ डिसेंबर २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड’ या संस्थेमध्ये हा सर्व मुद्देमाल शास्त्रोक्त पद्धतीने जाळण्याच्या प्रक्रियेद्वारे नष्ट करण्यात आला. अंमली पदार्थांच्या विरोधात रत्नागिरी पोलीस सातत्याने कठोर पावले उचलत असून, या विल्हेवाटीमुळे गुन्ह्यातील जुना मुद्देमाल निकाली काढण्यात आला आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ तस्करीच्या साखळीला मोठा इशारा दिला आहे.