चालकाविरोधात गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर न्यायालयाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पायावरून कार गेल्याने अपघात घडला आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेत महिला जखमी झाली असून, याप्रकरणी कार चालकावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला लक्ष्मण कोकाटे (वय ६५, रा. केळवली, ता. राजापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. उर्मिला कोकाटे या राजापूर न्यायालयात कामासाठी आल्या होत्या. त्या न्यायालयासमोर असलेल्या पंढरपुरी चहाच्या टपरी नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्याचवेळी लाल रंगाची कार (क्रमांक एमएच ०८ एएक्स ६७०२) घेऊन आलेल्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून उर्मिला यांच्या उजव्या पायावर घातले. चाक पायावरून गेल्याने त्या जखमी झाल्या.
या अपघातानंतर उर्मिला कोकाटे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक शाहिदली मोहम्मद सलीम चौगले (रा. राजापूर) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ आणि १२५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.









