Wednesday, May 6, 2026
spot_img
Home संगमेश्वर देवरुख येथे बाथरूममध्ये विवाहितेचा जळून मृत्यू

देवरुख येथे बाथरूममध्ये विवाहितेचा जळून मृत्यू

वरची आळी येथील घटना

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अक्षरा अरविंद मोहिते असे मृत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवार, २२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार २१ डिसेंबर रोजी रात्री अक्षरा मोहिते या नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपल्या होत्या. दरम्यान, सोमवारी २२ डिसेंबर रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास त्यांचा सात वर्षांचा मुलगा आलोक याला लघवीसाठी जाग आली. त्यावेळी त्याला आई बिछान्यावर दिसली नाही. मुलाने घरातच राहणाऱ्या वडिलांच्या मावशी ताराबाई शिंदे यांना उठवले. ताराबाई आणि आलोक यांनी घरात शोधाशोध केली, मात्र अक्षरा मिळून आल्या नाहीत. घाबरलेल्या मुलाने आणि ताराबाई यांनी शेजारी राहणारे काका दत्ताराम तुकाराम मोहिते यांना उठवून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वांनी मिळून पुन्हा शोध घेतला असता, घराबाहेरील बाथरूममध्ये अक्षरा या भाजलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घटनेची माहिती तात्काळ देवरुख पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अक्षरा यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.