रत्नागिरी:- राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर तोफ डागत महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. कितीही आघाड्या झाल्या तरी त्याचा महायुतीवर परिणाम होणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आता सक्षम नेतृत्व राहिलेले नाही. प्रदेशाध्यक्ष कमकुवत आहेत हे वडेट्टीवार यांना कळून चुकले आहे, म्हणूनच ते गांधी घराण्याच्या जवळ जाऊन प्रदेशाध्यक्ष होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या ‘ॲक्शन प्लॅन’चा समाचार घेताना त्यांनी गंभीर आरोप केला. ठाकरेंना केवळ ‘हाय टेंडर’मध्ये रस होता आणि टेंडर मिळवणे हाच त्यांचा खरा ॲक्शन प्लॅन होता, अशी टीका त्यांनी केली. तसेच, २५ वर्षे मराठी माणसाचे वाटोळे करणाऱ्यांनी आता तरी ॲक्शन मोडवर यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ठाणे महानगरपालिकेच्या जागावाटपावर भाष्य करताना सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील राजकीय परिपक्वता ही कोणत्याही पत्रापेक्षा मोठी असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये युती होणार असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याबद्दल त्यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली. “नवाब मलिक मुंबईत नेतृत्व करणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही, तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कोकणातील राजकीय समीकरणांवर बोलताना त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत महायुतीचे वर्चस्व राहील असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून, उद्धव ठाकरेंनी कितीही कॅलेंडर बनवली किंवा विकेट मोजल्या तरी आगामी २५ वर्षे त्यांची याच हिशोबात जातील, अशी बोचरी टीका सामंत यांनी यावेळी केली.









