Friday, May 1, 2026
spot_img
Home संगमेश्वर उपळे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

उपळे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

संगमेश्वर:- तालुक्यातील उपळे वरचीवाडी येथील एका ५२ वर्षीय प्रौढाचा औषध सेवनातून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश गुणाजी जाधव (वय ५२) असे मयताचे नाव असून, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जाधव यांनी १२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरात कोणतेतरी औषध घेतले होते. या औषधामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी येथे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच १४ डिसेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद १७ डिसेंबर रोजी करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४३/२०२५ नुसार नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.