रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पावस सामंतवाडी येथे एका ६० वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत झालेल्या घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेमुळे पावस परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशोक रामचंद्र वारीसे असे मृत व्यक्तीचे नाव असून पूर्णगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अशोक वारीसे यांना दारूचे व्यसन होते. सोमवारी, १५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते दारूच्या नशेत घरी आले आणि पत्नीला शिवीगाळ करत बडबड करू लागले. पत्नीने त्यांना ‘बडबड करू नका’ असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा राग मनात धरून अशोक यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यांनी खोलीच्या लोखंडी बारला फॅनच्या सहाय्याने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. काही वेळाने अशोक यांचा मुलगा तिथे आला असता, त्याला वडील खोलीत लोंबकळत असलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तातडीने खोलीचा दरवाजा तोडून वडिलांना खाली उतरवले आणि त्यांच्या गळ्यातील दोरी सोडवली.
अशोक वारीसे यांची कोणतीही हालचाल होत नसल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घरगुती कलह आणि व्यसनाधीनतेतून ही आत्महत्या घडल्याचे बोलले जात आहे.









