रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी-महालक्ष्मी मंदिर रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी मृत दुचाकीस्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या शनिवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास खेडशी-महालक्ष्मी मंदिर रस्त्यावरील राधाकृष्ण ग्रेनाईटचे समोर घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार विशाल अनिल घायवट (वय २१, रा. शिवलीला अपार्टमेंट स्वामीनगर खेडशी रत्नागिरी) हे रिक्षा टेम्पो (क्र. एमएच-०८ बीसी १२७९) हा निवळी ते रत्नागिरी असा घेऊन येत असताना महालक्ष्मी मंदिराच्या मागे राधाकृष्ण ग्रेनाईटच्या समोर आले असताना पाठीमागून येणारी दुचाकी (क्र. एमएच-०८ ए डब्ल्यू १६६२) वरील चालक राज सुधाकर कोत्रे (वय १९, रा. कापडगाव, रत्नागिरी) याने दुचाकी निष्काळजीपणे चालवून रिक्षा टेम्पोला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात. दुचाकी वरिल पार्थ विजय कुरतडकर (वय १९) व आर्यन विनोद कुरतडकर (वय १९ दोघेही रा. कापडगाव-रत्नागिरी) हे जखमी झाले तर स्वार राज कोत्रे स्वतःच्या मरणास कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी मृत स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









