रत्नागिरी:- राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचं अतोनात नुकसान झाले. राज्य सरकारने 4 लाख 6 हजार 430 हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी 482 कोटी 10 लाख 69 हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. कोकण विभागासाठी ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीसाठी 48 कोटी 59 लाख 9 हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 3 कोटी 66 लाख 82 हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटी 8 लाख 69 हजार रुपये वाटपास मंजूर देण्यात आली आहे.
सरकारने याबाबतचा शासन निर्णय मंगळवार दि. 9 जारी केला आहे. यामध्ये दोन हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यात अतिवृष्टीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान 84 लाख हेक्टरवरील शेती पिकं बाधित झाली. त्यासाठी राज्य सरकारने 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. परंतु शासन निर्णयात मात्र मदतीचे दर आणि निकष जुनेच ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची तुटपुंज्या मदतीवर बोळवण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोकण विभागात ठाणे जिल्ह्यासाठी 16 कोटी 81 लाख 89 हजार रुपये, पालघर जिल्ह्यासाठी 9 कोटी 32 लाख 36 हजार रुपये, रायगड जिल्ह्यासतही 14 कोटी 69 लाख 33 हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 3 कोटी 66 लाख 82 हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटी 8 लाख 69 हजार रुपये वाटपास मंजूर देण्यात आली आहे.









