शिक्षक आंदोलनात सहभागी ८०० शिक्षकांचे १ दिवसाचे वेतन कपात

रत्नागिरी:- शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेसंबंधी निर्णयाविरोधात आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे ८०० प्राथमिक शिक्षकांनी शुक्रवारी (दि. ५) सामूहिक रजा आंदोलन करत शाळा बंद ठेवल्या होत्या. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे आता एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने शुक्रवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पालिका निवडणूक आचारसंहितेमुळे हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शिक्षक समन्वय समितीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आंदोलन स्थगित करण्यावरून जोरदार चर्चा झाली. या बैठकीत चार शिक्षक संघटनांनी आंदोलन स्थगितीला विरोध केला. या संघटनांनी शाळा बंद व सामूहिक रजा आंदोलन करण्यावर ठाम भूमिका घेतली. त्यावरून शिक्षक समन्वय समितीत फूट पडली. तरीही सुमारे ८०० शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपातीचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन कपात होणार आहे. १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेविषयक शासननिर्णय रद्द करावा आणि त्यानुसार समायोजन प्रक्रियेस तत्काळ स्थगिती आदेश द्यावेत. टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी आणि टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ लावून सुरू असलेली कार्यवाही तत्काळ थांबवावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.