रत्नागिरी:- जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या नगरपरिषद क्षेत्रांमध्ये आणि देवरुख, लांजा, गुहागर या नगरपंचायत क्षेत्रांमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
उपसचिव हेमंत महाजन यांनी परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ च्या कलम २५ मधील तरतुदीनुसार आणि शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून ही सुट्टी घोषित केली आहे.
या निवडणुकीसाठी घोषित केलेली सार्वजनिक सुट्टी केवळ संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशांनाच नव्हे तर संबंधित मतदार संघाच्या क्षेत्रातील, परंतु कामासाठी क्षेत्राबाहेर असलेल्या मतदारांना, केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि इतर वित्तीय संस्था या घटकांनाही लागू असेल.
या सार्वजनिक सुट्टीमुळे नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपला मतदानाचा हक्क बजावणे शक्य होणार आहे.









