रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने (शिंदे) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारण तापलं आहे. शिवसेनेची (उबाठा) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचे पुत्र अथर्व साळवी हे प्रभाग क्रमांक १५ मधून रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे राजन साळवींना मोठा धक्का बसला आहे. अशात. अथर्व साळवी यांनी एक भावनिक पत्र लिहून समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे.
अथर्व साळवी यांनी रत्नागिरीतील जनतेला उद्देशून म्हटलं आहे की “मी अथर्व राजन साळवी रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग १५ मधून आपल्यासाठी लढण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु महायुतीच्या निर्णयामुळे मला या निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे आणि हे सांगताना मन खरंच जड झालं आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व ज्येष्ठांचे हात, मित्रपरिवाराची साथ, खांद्यावरची थाप देणं, हे सगळं विसरणं माझ्यासाठी शक्यच नाही. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास हे माझं खरं बळ आहे.
अथर्व साळवी म्हणाले, नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामांसाठी धावपळ कधीच सोडणार नाही. निवडणूक नाही, पण जबाबदारी तशीच आहे आणि ती मी मनापासून निभावणार आहे. आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे. पद असो वा नसो, माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो, २४ तास, दिवस असो वा रात्र, कुठलीही अडचण आली तरी मी तुमच्यासाठी उभा आहे. राजकारण बदलू शकतं, पदं येतात-जातात, पण नातं? ते मात्र कायम राहतं, तुमचं आणि माझं अशी पोस्ट करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.









