जिल्ह्यात अनेक ठिकाणी रंगतदार लढतींची चिन्हे

नगराध्यक्षपदासाठी 56 तर नगरसेवकपदासाठी 635 अर्ज

रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. सोमवारी एका दिवसात नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 35 आणि नगरसेवक पदासाठी तर नगरसेवक पदासाठी 364 अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरात नगराध्यक्ष पदासाठी 56 तर नगरसेवक पदासाठी 635 अर्ज दाखल झाले आहेत.

सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम दिवशी सकाळी एबी फॉर्मचे वाटप केले. यामुळे सोमवारी सकाळपासूनच अर्ज भरण्याच्या केंद्रांवर अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तो फॉर्म अन्य कागदपत्रांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येत होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

रत्नागिरीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. मात्र महायुतीत फूट पडल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आपने देखील थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. याशिवाय चिपळूण, राजापूर, खेड येथील लढती देखील लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज करण्याच्या अंतिम दिवशी रत्नागिरीतून नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 132, चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 141, खेड मधून नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 82 अर्ज दाखल झाले आहेत. राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 5 आणि नगरसेवक पदासाठी 65 अर्ज दाखल झाले आहेत. गुहागर मधून नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 56 अर्ज दाखल झाले आहेत. देवरुख मधून नगराध्यक्ष पदासाठी 9 आणि नगरसेवक पदासाठी 79 अर्ज आणि लांजा मधून नगराध्यक्ष पदासाठी 7 आणि नगरसेवक पदासाठी 80 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.