रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी अपक्ष आणि आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. रविवार 16 नोव्हेंबर पर्यंत नगरसेवक पदासाठी 44 अर्ज दाखल झाले आहेत तर थेट नगराध्यक्ष पदासाठी आपकडून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता सोमवार अंतिम मुदत असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या काही दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याला थंडा प्रतिसाद मिळाल्यानंतर मागील दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची चिन्हे असताना रविवारी आम आदमी पक्षाने देखील रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उडी घेतली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 नोव्हेंबर पर्यंत 20 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. रविवारी नव्याने 24 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात अपक्ष आणि आम आदमी पक्षाने देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रविवारी दाखल करण्यात उमेदवारी अर्जांमध्ये सात अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये चवंडे अस्मिता सुशील प्रभाग 15 अ, मयेकर मैथिली देवेंद्र प्रभाग 12 अ, वालम अनिकेत अनिल प्रभाग 1 ब, काझी सायमा नदाफ प्रभाग 4 अ, कदम मंजुळा विजय प्रभाग 5 ब, कदम सरिता जितेंद्र 5 ब आणि बेग कामना अरुण यांनी प्रभाग 9 ब मधून उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सावंत प्रसाद सुरेश 3 ब, शिवलकर राजश्री बिपीन 15 अ, पावसकर साजीदखान अकबरखान 8 ब, विलणकर अमित वसंत 15 ब आणि हकीम नाझनीन युसुफ 9 ब यांनी उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय भाजपकडून जाधव नितीन लक्ष्मण 1 ब मधून उमेदवारी दाखल केली आहे.
शिंदे शिवसेनेकडून पिलणकर जागृती राहूल 12 अ, पाटील सायली विकास 9 ब, कीर संतोष विजय 14 ब, सोलकर नाहिदा तन्वीर 8 अ मधून अर्ज दाखल केला आहे. आम आदमी पार्टी कडून सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये वस्ता खलील नुरुद्दीन 16 ब, वस्ता रेहाना खलील 16 अ, झारी रमीज इसाक 1 ब, खान तमन्ना करीम 9 ब, नावडे रुक्साना लियाकत 1 अ, मजगावकर नफिसा मोहम्मद 4 अ आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सुस्मिता सुहास यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पक्षनिहाय दाखल अर्ज
भाजप-6
शिवसेना-13
प्रहार जनशक्ती पक्ष -2
अपक्ष-11
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) -5
आम आदमी पार्टी – 7









